Sunday, November 25, 2018

फक्त एका क्षणासाठी.....


माझी कविता

सारे काही फक्त एका क्षणासाठी
जगण्यासाठी घातलेला घाट फक्त एका क्षणासाठी...

दुखावलेलं मन मनातील राग
रागाची आग एका क्षणासाठी,
झालेला गर्व मागितलेला मान
दुखावलेला स्वाभिमान फक्त एका क्षणासाठी....

भक्तीचा भाव गुंतलेला जीव 
आलेली किव एका क्षणासाठी,
जडलेलं प्रेम प्रेमाचा थाट
भ्रमाचा माठ फक्त एका क्षणासाठी....

झाडाचे फुल फुलांचा रंग
रंगांचा संग एका क्षणासाठी,
टोचलेला काटा कापलेलं पातं
पात्याची धार फक्त एका क्षणासाठी....

 एखाद्याची आस त्याचा झालेला भास
आनंदाची रास एका क्षणासाठी,
दुखलेली आशा खुपलेली भाषा
झालेली निराशा फक्त एका क्षणासाठी....

डोळ्यापुढचा अंधार अंधाराची भिती
भितीचे वादळ एका क्षणासाठी,
वादळाचे बळ पावसाचा छळ
विजांचा धाक फक्त एका क्षणासाठी...

मिळालेला पैसा पैशाचे घबाड
घबाडाचा माज एका क्षणासाठी,
खाल्लेला घास घेतलेला श्वास
जगण्याची आस फक्त एका क्षणासाठी....

माणसाचा देह देहांची लाट
लाटेचं आयुष्य एका क्षणासाठी,
सारं काही फक्त एका क्षणासाठी...

Nothing is permanant in life.
आयुष्यात काहीच कायमस्वरुपी नसतं, जे आहे ते सर्व क्षणभंगुर. मग आपण कशाला इतके दुःखी होतो किंवा कशाचा इतका गर्व आणि माज करतो?

Written by- गौरव शशिकांत कुंभार

No comments:

Post a Comment