Monday, August 5, 2019

स्वप्नं...


थोडी अवखळ
थोडी अल्लड,
थोडी कोमल
थोडी नाजुक,
काही विचित्र
तर काही सुंदर,
किती छान असतात ना ही स्वप्न,
त्यांच्या मुळेच जगण्याला मिळतो अर्थ

निराशेची ओझी डोक्यावर वाहत असताना,
नव्याने जगण्याची आस निर्माण करतात ही स्वप्नं

ग्रीष्माच्या उन्हात करपून निघालेल्या अपेक्षांना,
पावसाच्या प्रत्येक थेंबाप्रमाणे गारवा देतात ही स्वप्नं

आटलेल्या विहीरीसारख्या कोरड्या झालेल्या भावनांना
नव्याने पाझर फोडतात ही स्वप्नं
 आणि शरदाच्या चांदण्यासारखं मनाच्या प्रत्येक कोपर्यात आल्हाद निर्माण करतात ही स्वप्नं

स्वप्नं फक्त आपलीच असता,
प्रत्यक्षात जरी नसली आली तरी
फक्त त्यांच्या विचारानेच जगणं सुंदर होऊन जातं
आणि हरवून जावसं वाटतं
पुन्हा कधीही न परतण्यासाठी...
-गौरव कुंभार

Thursday, July 25, 2019

ती...ती एक जलपरी समुद्राच्या पाण्यालाही सौंदर्य देणारी,
तितकीच कोमल आणि नाजुक हसणारी

ती एक नदी मंद वाहणारी
वार्याच्या चाहुलीने हळुच डोलणारी

ती एक फुलपाखरू फुलांवर राहणारी,
मधासारखी गोड अन् फुलासारखी फुलणारी


ती एक चांदणी आकाशी राहणारी
लुकलुकणारी आणि हळुच पाहणारी


ती.... 
ती म्हणजे ह्रदय माझ्यात धडधडणारी,
आणि प्रेमाच्या पावसात चिंब भिजणारी ती...... 


                                                   -गौरव  कुंभार

Wednesday, January 16, 2019

माझी कविता


आठवणी... 

वणवण करुन आपल्या हातात उरतेच काय?
 मर मर मरुन सुद्धा नुसत्या पाण्याने तहान सरते काय?

 घेणारे तर खुप असतात देणाराच नसतो,
 ऐकणारे ही असतात पण समजणारा नसतो,
 देऊन घेऊन बोलुन ऐकुन कोण कुणाला पुरते काय?
 मर मर मरुन सुद्धा नुसत्या पाण्याने तहान सरते काय?

 देह दिला म्हणून कोणी त्याचे आभार मानत नाही,
 सुख नाही दिले म्हणून त्यालाच बोलतात सर्व काही,
 सुख दुःख आपले कर्म, त्याच्या हातात असतेच काय?
 मर मर मरुन सुद्धा नुसत्या पाण्याने तहान सरते काय? 

 प्रेमाची ही भाषा नाही कोणाला कळत,
 मैत्रीमध्ये सुद्धा बसतात एकमेकांना जाळत,
 प्रेम मैत्री माया आपुलकी सगळे स्वप्नातच असते काय?
 मर मर मरुन सुद्धा नुसत्या पाण्याने तहान सरते काय?

 दुसर्यावरती जीव लावुन आपले मन रडत असते,
 ज्याच्यावरती जीव लावला त्याला मात्र काहीच नसते,
 सगळे प्रयत्न संपले तरी मनातली आशा संपत नाही,
 वणवण करुन सुद्धा हाती काहीच उरत नाही....

 ना मित्र ना माया ना आपुलकी ना प्रेम,
 माणुस सरल्यानंतर सगळे रडतातही सेम,
 काय उपयोग या आयुष्याचा ज्यात फक्त चिंताच आहे,
 कोणी नाही म्हटलं तरी निदान आठवणींची तरी सोबत आहे...     

कवि -गौरव शशिकांत कुंभार 

Wednesday, January 9, 2019

कधी वाटते...

कधी वाटते आपल्यासाठी
जगात कोणी नाही,
तर कधी वाटते आपल्याच साठी
आहे सर्व काही.

 कधी होते मन उदास इतके
काहीच बोलता येत नाही,
तर कधी वाटते इतके बोलावे
की शब्दच पुरत नाही.

 कधी मनात ढग
येतात दाटून आठवांचे,
कधी होते मन हळवे आणिक
फुटतात बांध भावनांचे.

कधी तरी मनाला कोणाचा तरी
खुप राग येतो,
मग वाटते उगाच
आपण दुसर्यांना दोष देतो.

उगाच आपण स्वतःला
एकटे म्हणवून घेतो,
नंतर कळते आपल्यासाठी
कुणीतरी जगत असतो.

असावे आयुष्यात कुणीतरी
समजावून घेणारे,
स्वप्नांचे आपले जग
अलगद पेलून नेणारे....   
Written by Gaurav Shashikant Kumbhar

Monday, December 24, 2018

सहज सुचलेलं.....


                                       रं मासांचे.....(भाग - १)           

          माणुस?.... काही म्हणतील यात लिहण्यासारखे काय आहे? पण हा एकच विषय असा आहे ज्यावर कितिही लिहायला गेले तरी तरी ते कमीच पडेल. या जगात जेवढे रंग अस्तित्वात नाहीत तेवढे रंग आहेत माणसांचे आणि ते रंग बदलण्याचा वेग इतका आहे कि एखाद्या फेरारी गाडीला सुद्धा मागे टाकतील.(अनुभवाचे बोल). सुरुवातीपासून सुरुवात करायची म्हटलं तर (हल्ली पिक्चरची सुरुवात शेवटापासून  होते) हा लेखच घ्या काही  लोकं या लेखाची लांबी बघुनच नाक मुरडायला सुरुवात करतील.त्यांना वाटेल की हे वाचण्यापेक्षा Facebook आणि Instagram वर Likes करणे जास्त सोपं आहे. सगळ्यांनी वाचावं अशी अजिबात अपेक्षा नाही. वाचणारी वाचतातच त्यांना सांगायची गरज नसते. आणि कोणीतरी वाचुन मला वाह वा करावी म्हणून मी लिहतच नाही मुळी. Blog हे आपले विचार share करण्यासाठी असतात. पण यातुन माणसाची प्रवृत्ती सांगायची म्हणाली तर whats app च्या status ला लावलेल्या post च्या link ला 30 views असले तरी प्रत्यक्षात हे वाचणारी नऊ ते दहा असतात फक्त. अणखी एक असे की पुढे  लिहिलेली कही वाक्यं वाचुन काहींना हा प्रश्न पडेल कि हे यानंच लिहलय ना नक्की की कुठून चोरलय? त्यांच्यासाठी एक खास माहिती अशी की मला चोरी करता येत नाही आणि मी ती कधी केलेलीही नाही. ना पैशाची (आई बाबा देतात मला), ना कुठल्या वस्तुची, ना ह्रदयाची आणि ना कुणाच्या लेख आणि कवितांची.
           तर विषय असा की माणुस रंग बदलतो. वैज्ञानिक शोधांच्या मते माणसाची उत्पत्ती ही माकडापासुन झाली पण हे रंग पाहुन असं वाटतं की माणुस हा माकडापासून नाही तर सरड्याच्या विकासातून बनला असावा( माझ्या मते). माणुस हा एकमेव प्राणी आहे ज्याला विचार करण्याचे वरदान मिळाले आहे. सगळे नियम हे माणसानेच बनवले आहेत आणि तेही आपल्यासाठीच. पण ते पाळतय कोण? आता फुलपाखराचंच उदाहरण घ्या(मालिका नव्हे), न्युटनच्या गतीच्या नियमानुसार फुलपाखरु हे उडू शकत नाही. पण तरीही ते उडतेच ना! का? कारण त्याला नियम माहितच नाहीत. आपण ते त्याला लागू करायला जातो. पण ते होत नाहीत. कारण माणसाने बनवलेले नियम हे माणसाने बनवलेल्या गोष्टींनाच लागू होतात.
           माणसाला मिळालली आणखी एक देणगी म्हणजे विश्वास (#विक्रांत सरंजामे- तुला पाहते रे. याचा तरी विश्वास किती खरा आहे हे ते पात्र लिहणार्या लेखकालाच माहित) (हॅशटॅग बघुन मन खुश झालं ना?) विश्वास हा माणसांतून दुरावत चाललाय. कोणाचाही कोणावरही विश्वास राहिलेला नाही. सगळी स्वार्थी होत आहेत. सगळ्यांना फक्त आपल्या कामाची पडलेली असते. आपलं काम निघालं कि रोजचे पाढे पंचावन्न. सगळे फक्त स्वतःचीच स्तुती करत असतात. लांबचं कशाला, जमुन बोलत बसलेल्या चार बायका सुद्धा स्वतःची मुलं किती चांगली(भलेही नसली तरी), किती हुशार, स्वतःच्या सुना किती कामं करतात(भलेही बसुन खात असतील, सासुला कामाला लावुन) यावरच बोलत असतात.आपलं ते किती चांगलं आणि समोरच्याचं किती वाईट हे पटवून देण्याची जणु शर्यतच लागलेली असते त्यांच्यात. अशी स्वतःची स्तुती करणाऱ्यां बद्दल  मला भयंकर तिरस्कार आहे. कशाला स्वतःचे गोडवे गायचे? गुण असतील (चांगलेही आणि वाईटही) तर ते दिसतातच कि त्यात सांगायची काय गरज? 
           काही लोकं तर अशी असतात कि उचलली जीभ लावली टाळ्याला. मनात येईल तसे बोलत असतात. समोरच्याला काय वाटेल याचा जराही विचार करत नाहीत(विकृत कुठचे). समोरचा त्यांचं बोलणं ऐकून मेला जरी (देव करो आणि असं कधीही न होवो) तरी या महाभागांना काही फरक पडत नाही. असं कधी करू नये. समोरच्याला समजुन घ्यावं. मग बोलावं. नाहीतर माणसं व्यक्त होत नाहीत. आतल्या आतल्या आत सडतात. मग लेखनासारखा एखादा मार्ग शोधतात आणि व्यक्त होण्याचा प्रयत्न करतात(यशस्वी नाही झाला तरीही). हल्ली कोणाजवळ व्यक्त व्हावे हाही मोठा प्रश्न आहे. समोरचा माणुस समजुन घेणारा असला पाहिजे आणि त्याला 

बोल दो ना जरा
 दिल में जो है छुपा
 मैं किसी से कहूंगा नही
           हे गाणं येणं अनिवार्य आहे.(जरा जास्त होतय वाटतं?) अशी ही माणसं अनेक रंगांची. पण ही माणसं फक्त सुखंच शोधत असतात. दुःख कोणालाच नको असतं. पण असं जरी म्हटलं तरीही दुःख हे असतंच. फक्त त्याचा किती प्रभाव पाडून घ्यायचा हे आपल्यावर असतं. सगळ्यांच सुख हे एकसारख्या गोष्टीत असलं तरी दुःख मात्र वेगवेगळं असतं. पण ते लपवुन मग खोटं हसणं कुणाला तरी सांगण्या पेक्षा सोपं वाटतं. कारण सगळ्यांना स्वतःची अशी वेगळी (दुःख) असतात. माणसं इतकी स्वार्थी झालेत कि चांगुलपणावरचा विश्वास उडत चाललाय. मग आपणही स्वार्थी का असु नये हा विचार मनात आला तर नवल नको वाटायला. म्हणुनच माणसानं बदलण्याची खुप गरज आहे. माझा मी पणा सोडून इतरांना समजून घेण्याची गरज आहे. एक वाक्य बोलताना दहा वेळा विचार करावा. प्रत्येकाने जर आपल्यामुळे दुसर्यांना त्रास होणार नाही असे वागले तर सगळेजण किती सुखी होतील. नाही का?
 Written by- Gaurav Shashikant Kumbhar

Sunday, November 25, 2018

फक्त एका क्षणासाठी.....


माझी कविता

सारे काही फक्त एका क्षणासाठी
जगण्यासाठी घातलेला घाट फक्त एका क्षणासाठी...

दुखावलेलं मन मनातील राग
रागाची आग एका क्षणासाठी,
झालेला गर्व मागितलेला मान
दुखावलेला स्वाभिमान फक्त एका क्षणासाठी....

भक्तीचा भाव गुंतलेला जीव 
आलेली किव एका क्षणासाठी,
जडलेलं प्रेम प्रेमाचा थाट
भ्रमाचा माठ फक्त एका क्षणासाठी....

झाडाचे फुल फुलांचा रंग
रंगांचा संग एका क्षणासाठी,
टोचलेला काटा कापलेलं पातं
पात्याची धार फक्त एका क्षणासाठी....

 एखाद्याची आस त्याचा झालेला भास
आनंदाची रास एका क्षणासाठी,
दुखलेली आशा खुपलेली भाषा
झालेली निराशा फक्त एका क्षणासाठी....

डोळ्यापुढचा अंधार अंधाराची भिती
भितीचे वादळ एका क्षणासाठी,
वादळाचे बळ पावसाचा छळ
विजांचा धाक फक्त एका क्षणासाठी...

मिळालेला पैसा पैशाचे घबाड
घबाडाचा माज एका क्षणासाठी,
खाल्लेला घास घेतलेला श्वास
जगण्याची आस फक्त एका क्षणासाठी....

माणसाचा देह देहांची लाट
लाटेचं आयुष्य एका क्षणासाठी,
सारं काही फक्त एका क्षणासाठी...

Nothing is permanant in life.
आयुष्यात काहीच कायमस्वरुपी नसतं, जे आहे ते सर्व क्षणभंगुर. मग आपण कशाला इतके दुःखी होतो किंवा कशाचा इतका गर्व आणि माज करतो?

Written by- गौरव शशिकांत कुंभार

Wednesday, November 21, 2018

आठवणीतली शाळा...

       


           शाळा म्हटलं कि सगळ्यांना आपल्या लहानपणीचे दिवस आठवतात. ते दिवस प्रत्येकासाठीच खूप महत्त्वाचे असतात. कारण त्या मोहरलेल्या दिवसातच बालपण खुलत असते. शाळेतले ते वर्ग, शाळेचे मैदान, शाळेतील शिक्षक या सर्वांशीच आपले घट्ट नाते तयार होते. मित्रांच्या संगतीत काही आठवणी तयार होतात. याच आठवणी आपल्याला आयुष्यभर जगण्याचे बळ देत असतात. या आठवणी नुसत्या आठवल्या तरी मन कसे बहरुन जाते. पुन्हा लहान व्हावेसे वाटते. जगण्याची नवीन आशा निर्माण होते आणि आयुष्याला नवीन पालवी फुटते. 
          ते दिवस असतातच खुप खास. जिवनाला नवे वळण देण्याची ताकद असणारे संस्कार याच वयात मनावर कोरले जातात ते आयुष्यभरासाठी, कधीही पुसले न जाण्यासाठी. हे संस्कार खोलवर रुजवण्यात मोलाचा वाटा असतो तो त्या गुरूजनांचा. त्यांनीच या मोठ्या आव्हानाचे शिव धनुष्य आपल्या हाती धरून या विश्वावर खुप मोठे उपकार केले आहेत. त्यांच्या तेजातुनच आपले आयुष्य घडवण्याचे बळ आपल्याला मिळत असते. शाळेतील त्या मोहरलेल्या दिवसांवर जादुची छडी फिरवून ते आणखीनच रंजक बनवण्याचे काम ही देव माणसे करत असतात. आपल्या शिष्यांसाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता दिवस रात्र कष्ट घेतात. त्यांच्या शिवाय शाळा कायम अपुर्णच असते.

          शिक्षकांबरोबरच शाळेच्या आठवणीतली आणखी एक व्यक्ती म्हणजे बालमित्र. ते तर सगळ्यांचेच असतात. काहींचे चतुर तर काहींचे खट्याळ, काहींचे शांत तर काहींचे दंगेखोर. पण या सगळ्याचा मैत्रीवर कोणताही परिणाम होत नसतो. त्या वयात तर ते कळत पण नसते कळत असते ती फक्त निव्वळ मैत्री. त्या मित्रांच्या आठवणीत भर घालतात ते मैदानावरील खेळ आणि त्या खेळातील चिडवा चिडवी. अशी मुले क्वचितच कुठे तरी असतील जी खेड्यात राहून देखील शाळेत गोट्या आणि विटी दांडू खेळले नसतील. तसंच पावसाळ्यात एकमेकांचे गणवेश चिखलाने घाण करणे किंवा चिखलाने माखलेला चेंडू एकमेकांना मारून खेळणे या खेळांची गम्मत तर काही औरच होती. ते चिखलाचे डाग धुवून गेले पण मनावर त्याच्या आठवणीचे ठसे कायम तसेच आहेत. खेळताना धडपडुन झालेल्या जखमा अजुनही आपल्याला खुणावत असतात. 

          वर्गात शिक्षक शिकवत असताना घातलेला गोंधळ, त्यांनी फळ्याकडे तोंड फिरवल्यावर हळूच खाल्लेल्या चिंचा, त्याच वेळी एकमेकांना मारलेले चिंचोके, गृहपाठाच्या गुणांसाठी शिक्षकांची केलेली ज्यादाची कामे, सुट्ट्या संपल्यावर शाळेची केलेली झाड लोट या आणि अशा कित्येक गोष्टी त्या आठवणींना अधिकच मोहक बनवतात. दोन क्षण का होईना पण मनाला विसावा देतात. धकाधकीच्या आयुष्यात जगण्याची नवी उमेद देतात. त्या आठवणींतून बाहेर पडल्यावर जाणिव होते वर्तमानाची आणि मग सुरू होतो पुन्हा रोजचा प्रवास.......

A tribute to the memories of the school..... 


Written by - गौरव शशिकांत कुंभारमाझ्या आठवणीतली शाळा

Tuesday, November 20, 2018

संगत दोस्तीची.......

माझी कविता 

दोन दिसांची मैत्री आणिक दोन दिसांची गम्मत जम्मत, 
आयुष्याच्या चार दिसात या दोस्तीची ही सुरेल संगत.

दोन माणसे निरनिराळी मनात बंध रुजलेले 
शब्दातूनी खुलती भावना घेऊन भाव मनी निजलेले,
भावनांच्या लाटेवर फिरता उलगडते शब्दांची गम्मत 
आयुष्याच्या चार दिसात या दोस्तीची ही सुरेल संगत.

विश्वासाचे अतूट नाते मनाला खुप भावते 
विचारांच्या रस्त्यावर मन तूफान धावते, 
विश्वासाच्या गोडीमधुनी वाढावी जीवनाची रंगत 
आयुष्याच्या चार दिसात या दोस्तीची ही सुरेल संगत.

मैत्री मधले रूसवे फुगवे असतात खुप गोड 
एक चिडला असताना दुसऱ्याला हसायची खोड, 
चिडवा चिडवी हसवा हसवी करतानाही येते गम्मत 
आयुष्याच्या चार दिसात या दोस्तीची ही सुरेल संगत.

दूर असूनही मने जुळावी 
शब्दांनाही मग कोडी पडावी,
इंद्र धनुवर जशी रंगांची पडावी पंगत 
तशीच 

आयुष्याच्या चार दिसात या दोस्तीची ही सुरेल संगत.

A poem by Gaurav Shashikant Kumbhar