Wednesday, November 21, 2018

आठवणीतली शाळा...

       


           शाळा म्हटलं कि सगळ्यांना आपल्या लहानपणीचे दिवस आठवतात. ते दिवस प्रत्येकासाठीच खूप महत्त्वाचे असतात. कारण त्या मोहरलेल्या दिवसातच बालपण खुलत असते. शाळेतले ते वर्ग, शाळेचे मैदान, शाळेतील शिक्षक या सर्वांशीच आपले घट्ट नाते तयार होते. मित्रांच्या संगतीत काही आठवणी तयार होतात. याच आठवणी आपल्याला आयुष्यभर जगण्याचे बळ देत असतात. या आठवणी नुसत्या आठवल्या तरी मन कसे बहरुन जाते. पुन्हा लहान व्हावेसे वाटते. जगण्याची नवीन आशा निर्माण होते आणि आयुष्याला नवीन पालवी फुटते. 
          ते दिवस असतातच खुप खास. जिवनाला नवे वळण देण्याची ताकद असणारे संस्कार याच वयात मनावर कोरले जातात ते आयुष्यभरासाठी, कधीही पुसले न जाण्यासाठी. हे संस्कार खोलवर रुजवण्यात मोलाचा वाटा असतो तो त्या गुरूजनांचा. त्यांनीच या मोठ्या आव्हानाचे शिव धनुष्य आपल्या हाती धरून या विश्वावर खुप मोठे उपकार केले आहेत. त्यांच्या तेजातुनच आपले आयुष्य घडवण्याचे बळ आपल्याला मिळत असते. शाळेतील त्या मोहरलेल्या दिवसांवर जादुची छडी फिरवून ते आणखीनच रंजक बनवण्याचे काम ही देव माणसे करत असतात. आपल्या शिष्यांसाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता दिवस रात्र कष्ट घेतात. त्यांच्या शिवाय शाळा कायम अपुर्णच असते.

          शिक्षकांबरोबरच शाळेच्या आठवणीतली आणखी एक व्यक्ती म्हणजे बालमित्र. ते तर सगळ्यांचेच असतात. काहींचे चतुर तर काहींचे खट्याळ, काहींचे शांत तर काहींचे दंगेखोर. पण या सगळ्याचा मैत्रीवर कोणताही परिणाम होत नसतो. त्या वयात तर ते कळत पण नसते कळत असते ती फक्त निव्वळ मैत्री. त्या मित्रांच्या आठवणीत भर घालतात ते मैदानावरील खेळ आणि त्या खेळातील चिडवा चिडवी. अशी मुले क्वचितच कुठे तरी असतील जी खेड्यात राहून देखील शाळेत गोट्या आणि विटी दांडू खेळले नसतील. तसंच पावसाळ्यात एकमेकांचे गणवेश चिखलाने घाण करणे किंवा चिखलाने माखलेला चेंडू एकमेकांना मारून खेळणे या खेळांची गम्मत तर काही औरच होती. ते चिखलाचे डाग धुवून गेले पण मनावर त्याच्या आठवणीचे ठसे कायम तसेच आहेत. खेळताना धडपडुन झालेल्या जखमा अजुनही आपल्याला खुणावत असतात. 

          वर्गात शिक्षक शिकवत असताना घातलेला गोंधळ, त्यांनी फळ्याकडे तोंड फिरवल्यावर हळूच खाल्लेल्या चिंचा, त्याच वेळी एकमेकांना मारलेले चिंचोके, गृहपाठाच्या गुणांसाठी शिक्षकांची केलेली ज्यादाची कामे, सुट्ट्या संपल्यावर शाळेची केलेली झाड लोट या आणि अशा कित्येक गोष्टी त्या आठवणींना अधिकच मोहक बनवतात. दोन क्षण का होईना पण मनाला विसावा देतात. धकाधकीच्या आयुष्यात जगण्याची नवी उमेद देतात. त्या आठवणींतून बाहेर पडल्यावर जाणिव होते वर्तमानाची आणि मग सुरू होतो पुन्हा रोजचा प्रवास.......

A tribute to the memories of the school..... 


Written by - गौरव शशिकांत कुंभार



माझ्या आठवणीतली शाळा

1 comment:

  1. स्वतःच्या शाळेची आठवण ठेवणारे तुझ्यासारखे कांहीं मोजके च विद्यार्थी असतात,की ज्यांना शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल प्रेम आहे.
    काही क्षण मीही माझ्या शाळेच्या आठवणीत रमून गेलो.

    ReplyDelete