Monday, August 5, 2019

स्वप्नं...


थोडी अवखळ
थोडी अल्लड,
थोडी कोमल
थोडी नाजुक,
काही विचित्र
तर काही सुंदर,
किती छान असतात ना ही स्वप्न,
त्यांच्या मुळेच जगण्याला मिळतो अर्थ

निराशेची ओझी डोक्यावर वाहत असताना,
नव्याने जगण्याची आस निर्माण करतात ही स्वप्नं

ग्रीष्माच्या उन्हात करपून निघालेल्या अपेक्षांना,
पावसाच्या प्रत्येक थेंबाप्रमाणे गारवा देतात ही स्वप्नं

आटलेल्या विहीरीसारख्या कोरड्या झालेल्या भावनांना
नव्याने पाझर फोडतात ही स्वप्नं
 आणि शरदाच्या चांदण्यासारखं मनाच्या प्रत्येक कोपर्यात आल्हाद निर्माण करतात ही स्वप्नं

स्वप्नं फक्त आपलीच असता,
प्रत्यक्षात जरी नसली आली तरी
फक्त त्यांच्या विचारानेच जगणं सुंदर होऊन जातं
आणि हरवून जावसं वाटतं
पुन्हा कधीही न परतण्यासाठी...
-गौरव कुंभार

Thursday, July 25, 2019

ती...



ती एक जलपरी समुद्राच्या पाण्यालाही सौंदर्य देणारी,
तितकीच कोमल आणि नाजुक हसणारी

ती एक नदी मंद वाहणारी
वार्याच्या चाहुलीने हळुच डोलणारी

ती एक फुलपाखरू फुलांवर राहणारी,
मधासारखी गोड अन् फुलासारखी फुलणारी


ती एक चांदणी आकाशी राहणारी
लुकलुकणारी आणि हळुच पाहणारी


ती.... 
ती म्हणजे ह्रदय माझ्यात धडधडणारी,
आणि प्रेमाच्या पावसात चिंब भिजणारी ती...... 


                                                   -गौरव  कुंभार

Wednesday, January 16, 2019

माझी कविता


आठवणी... 

वणवण करुन आपल्या हातात उरतेच काय?
 मर मर मरुन सुद्धा नुसत्या पाण्याने तहान सरते काय?

 घेणारे तर खुप असतात देणाराच नसतो,
 ऐकणारे ही असतात पण समजणारा नसतो,
 देऊन घेऊन बोलुन ऐकुन कोण कुणाला पुरते काय?
 मर मर मरुन सुद्धा नुसत्या पाण्याने तहान सरते काय?

 देह दिला म्हणून कोणी त्याचे आभार मानत नाही,
 सुख नाही दिले म्हणून त्यालाच बोलतात सर्व काही,
 सुख दुःख आपले कर्म, त्याच्या हातात असतेच काय?
 मर मर मरुन सुद्धा नुसत्या पाण्याने तहान सरते काय? 

 प्रेमाची ही भाषा नाही कोणाला कळत,
 मैत्रीमध्ये सुद्धा बसतात एकमेकांना जाळत,
 प्रेम मैत्री माया आपुलकी सगळे स्वप्नातच असते काय?
 मर मर मरुन सुद्धा नुसत्या पाण्याने तहान सरते काय?

 दुसर्यावरती जीव लावुन आपले मन रडत असते,
 ज्याच्यावरती जीव लावला त्याला मात्र काहीच नसते,
 सगळे प्रयत्न संपले तरी मनातली आशा संपत नाही,
 वणवण करुन सुद्धा हाती काहीच उरत नाही....

 ना मित्र ना माया ना आपुलकी ना प्रेम,
 माणुस सरल्यानंतर सगळे रडतातही सेम,
 काय उपयोग या आयुष्याचा ज्यात फक्त चिंताच आहे,
 कोणी नाही म्हटलं तरी निदान आठवणींची तरी सोबत आहे...     

कवि -गौरव शशिकांत कुंभार 

Wednesday, January 9, 2019

कधी वाटते...

कधी वाटते आपल्यासाठी
जगात कोणी नाही,
तर कधी वाटते आपल्याच साठी
आहे सर्व काही.

 कधी होते मन उदास इतके
काहीच बोलता येत नाही,
तर कधी वाटते इतके बोलावे
की शब्दच पुरत नाही.

 कधी मनात ढग
येतात दाटून आठवांचे,
कधी होते मन हळवे आणिक
फुटतात बांध भावनांचे.

कधी तरी मनाला कोणाचा तरी
खुप राग येतो,
मग वाटते उगाच
आपण दुसर्यांना दोष देतो.

उगाच आपण स्वतःला
एकटे म्हणवून घेतो,
नंतर कळते आपल्यासाठी
कुणीतरी जगत असतो.

असावे आयुष्यात कुणीतरी
समजावून घेणारे,
स्वप्नांचे आपले जग
अलगद पेलून नेणारे....   
Written by Gaurav Shashikant Kumbhar